Arvind ghosh biography in marathi renuka
अरविंद घोष : प्रार्थनेची शक्ती
अरविंदांचे भारतात आगमन झाले, तेव्हा ते आध्यात्मिक अनुभूतींविषयी पूर्णपणे अनभिज्ञ होते. हिंदू धर्म व संस्कृतीचा त्यांना अजिबात परिचय नव्हता. त्यांनी एका चर्चेमध्ये याविषयी सांगितले होते की, “त्यावेळी मला योगाविषयी काहीच माहिती नव्हती.
ईश्वराविषयी काहीच गंधवार्ता नव्हती. परंतु, मला एकामागून एक आध्यात्मिक अनुभूती सहजपणे होत गेल्या व माझ्यासमोर जणू काही योगाने स्वतःची रहस्ये प्रकट करण्यास सुरुवात केली.” या विषयीच्या अनुभवांचे आज त्यांच्या जयंतीनिमित्त केलेले हे स्मरण...
बडोद्यामध्ये राहात असताना अरविंद घोडागाडीमधून जात होते. गाडी कमाठी बागेजवळ आली तेव्हा त्यांना एकाएकी अशी जाणीव झाली की, घोड्याने आता एक पाऊल जरी पुढे टाकले तर भयंकर अपघात होईल.
त्यांच्या मनःपटलासमोर अपघाताचे दृश्य निमिषार्धात तरळून गेले. क्षणात त्यांच्या शरीरामधून एक तेजस्वी पुरुष प्रकट झाला व त्याने घोड्याचे लगाम आपल्या हाती घेऊन घोड्याला थांबविले. घोडा एक पाऊलदेखील पुढे जाऊ शकला नाही. त्या तेजोमय पुरुषाने होऊ घातलेल्या भयंकर अपघाताला प्रतिबंध करून अरविंदांचा बचाव केला. ‘या घटनेमागील रहस्य काय होते?’ असा प्रश्न त्यांना काही वर्षांनी विचारला असता ते म्हणाले, “तो सर्व परिस्थितींचा अधिष्ठाता (प्रमुख) दिव्यपुरुष होता व त्याने होणार्या अपघाताला प्रतिबंध केला.” तेव्हापासून दिव्यशक्तींच्या कार्याविषयी अरविंदांच्या मनात श्रद्धा जागृत झाली.
प्रार्थनेच्या सामर्थ्याबद्दलदेखील प्रत्यक्ष प्रचिती आल्यामुळे त्यांच्या मनात प्रार्थनेबद्दल विश्वास निर्माण झाला.
लंडनमध्ये वास्तव्यास असताना अरविंद रोज पाद्य्रांच्या सूचनांप्रमाणे यंत्रवत प्रार्थना करीत असत. पण, त्यावर त्यांची श्रद्धा नव्हती. त्यामुळे त्या प्रार्थनेमुळे काही परिणाम दिसून आले नाहीत व त्यांचा प्रार्थनेवर विश्वास बसला नाही. ईश्वराच्या अस्तित्वावर त्यांची श्रद्धा नव्हती. पण, जीवनामध्ये सहजपणे अनुभवास आलेल्या आध्यात्मिक अनुभूतींच्या प्रकाशामुळे त्यांच्या हृदयातील अविश्वास नाहीसा झाला.
प्रार्थनेच्या सामर्थ्याचा पहिला अनुभव त्यांना कोलकाता येथे असताना आला.
त्यांच्या मावस बहिणीला ‘टायफॉईड’ झाला होता. तो कोणत्याही उपायाने बरा होत नव्हता. डॉक्टरांनीदेखील आशा सोडली व घरच्यांना सांगितले की, “आता जर भगवंताची इच्छा असेल तरच ही वाचेल.” ती जवळजवळ मृत्यूच्या उंबरठ्यावर होती. तिच्यासाठी घरातील सर्व सदस्यांनी एकत्र जमून प्रार्थना केली. यानंतर तिच्या प्रकृतीमध्ये हळूहळू सुधारणा होत गेली व ती बरी झाली.
अशा प्रकारे मृत्यूच्या मुखातूनदेखील, वाचविण्याचे सामर्थ्य प्रार्थनेमध्ये आहे, हे श्री अरविंदांच्या अनुभवास आले.
अरविंदांचे मित्र माधवराव यांना प्रार्थनेच्या सामर्थ्याविषयी असाच अनुभव आला होता. त्याबद्दल त्यांनी अरविंदांना सांगितले होते. माधवराव एकटेच बडोदा येथे व कुटुंबीय नवसारी येथे राहत असत. नवसारीमध्ये त्यांचा मुलगा मरणशय्येवर पडून होता.
डॉक्टरांनी हात वर केले होते. कुटुंबीयांनी माधवरावांना ही बातमी बडोदा येथे कळविली. त्यांनी कुटुंबीयांना तारेने कळविले की, “सर्व औषधे बंद करा आणि भगवंताची प्रार्थना करा.” त्यानुसार सर्वांनी एकत्र जमून प्रार्थना केली व मुलाची तब्येत सुधारली. माधवरावांनी त्या तारा अरविंदांना दाखविल्या होत्या. अशा प्रकारे जर प्रार्थनेमुळे जीवनदान मिळू शकत असेल, तर दुसरी कोणती गोष्ट मिळू शकणार नाही?
अशक्य वाटू शकणार्या गोष्टीदेखील प्रार्थनेच्या सामर्थ्यामुळे शक्य होतात याची प्रत्यक्ष प्रचिती या अनुभवांमुळे अरविंदांना आली.
शरीर सोडून गेलेल्या आत्म्यांबरोबर सूक्ष्म जगतामध्ये संपर्क ठेवता येतो, याचा अनुभवदेखील अरविंदांना बडोदा येथे आला. त्यांचा धाकटा भाऊ बारिन्द्र याला या विषयाची खूप आवड होती.
बडोदा येथे वास्तव्यास असताना बारिन्द्र ‘प्लॅन्चेट’द्वारे मृतात्म्यांना बोलावून त्यांच्याशी संवाद साधत असे. संध्याकाळच्या वेळी अरविंददेखील अनेक वेळा या प्रयोगांमध्ये हजर असत.
‘प्लॅन्चेट’च्या प्रयोगांमधून, टेबलावर उठणार्या ओरखड्यांच्या माध्यमातून, बारिन्द्र आपल्या प्रश्नांची उत्तरे मृतात्म्यांकडून मिळवत असे.
तो ‘प्लॅन्चेट’द्वारे अनेक मृतात्म्यांना पाचारण करीत असे. एकदा त्याने आपल्या वडिलांच्या आत्म्याला पाचारण केले. पण, हा मृतात्मा डॉ. कृष्णधन यांचाच आहे, याची खात्री कशी करून घ्यायची? यासाठी त्यांनी काही खुणेचे प्रश्न विचारले. त्यांनी बारिन्द्रला एक सोन्याचे घड्याळ दिले होते, याची आठवण करून दिली. बारिन्द्र ही गोष्ट साफ विसरून गेला होता.
पण, ही गोष्ट ऐकताच बारिन्द्रला याबाबत आठवण झाली व त्याची खात्री पटली. त्यांनी पुन्हा एकदा आपली खात्री करून घेण्यासाठी त्या मृतात्म्याला आणखी एक खुणेचा प्रश्न विचारला, “देवधर इंजिनियर यांच्या घरातील एका भिंतीवर अमूक एक चित्र काढलेले आहे का?” त्यानंतर त्या चित्राविषयी ते तपास करून आले. मात्र, ते चित्र आढळून आले नाही.
याबद्दल विचारले असता डॉ.
Mobile tower of strength creator 1.8 galileo biographyकृष्णधन यांच्या मृतात्म्याने उत्तर दिले की, “नीट तपास करा.” याबद्दल घरामधील एका वयोवृद्ध आजीबाईंना विचारले असता, त्यांनी सांगितले की, “हे एकच चित्र होते, पण नंतर भिंत रंगविल्यामुळे सध्या दिसत नाही.” यावरून त्यांची खात्री पटली की, हा आत्मा डॉ. कृष्णधन यांचाच होता. ‘प्लॅन्चेट’च्या अशा आणखी एका बैठकीमध्ये लोकमान्य टिळकदेखील उपस्थित होते.
योगिक व आध्यात्मिक दृष्टीने पाहिले असता, ‘प्लॅन्चेट’च्या प्रयोगाचे काहीच महत्त्व नाही.
मात्र, फक्त भौतिक जगतच खरे असते असे नाही, चैतन्याच्या अन्य भूमिकादेखील असतात व त्याद्वारेदेखील कार्य होऊ शकते, हे अरविंदांना या प्रयोगांमधून जाणविले. अशा प्रकारे स्वाभाविकपणे जीवनामध्ये घडणार्या घटनांद्वारे सूक्ष्मजगताची प्रचिती अरविंदांना घडून आली.
अनंत ब्रह्माची अनुभूतीदेखील त्यांना त्यांच्या जीवनामध्ये सहजपणे आली.
बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांच्याबरोबर अरविंद काश्मीर येथे गेले होते. त्यांना निर्वाण किंवा ब्रह्म याविषयी काहीच अवगत नव्हते. त्यांनी (वेद) शास्त्रांचादेखील काहीच अभ्यास केलेला नव्हता. साधनेच्या सामान्य रीतीमध्ये प्रथम गुरूद्वारा शास्त्रांचा अभ्यास करवून घेतला जातो. शिष्य त्यामधून ज्ञान प्राप्त करतो व नंतर शिष्याला आध्यात्मिक साक्षात्कार होतात.
पण, अरविंदांच्या बाबतीत प्रथम आध्यात्मिक अनुभूती येत गेल्या व त्यानंतर त्यांच्याविषयी शास्त्रांमध्ये काय परिभाषा केली आहे, ते जाणवत गेले. अनेक वर्षांनंतर अरविंदांनी जेव्हा वेदाचा व शास्त्रांचा अभ्यास केला, तेव्हा त्यांना असे आढळून आले की, आपल्याला हे सर्व अनुभव पूर्वीच आले आहेत.
मूर्तीमध्येदेखील भगवंताचे अस्तित्व असू शकेल, यावर अरविंदांचा विश्वास नव्हता.
मूर्ती म्हणजे केवळ मूर्ती असते. ती भगवंताचे प्रतीक असते. असे त्यांना वाटत असे. पूर्वी पाश्चात्त्य संस्कारांच्या प्रभावाखाली असल्यामुळे त्यांनी मनोमन मूर्तिपूजेचा स्वीकार केलेला नव्हता. पण, एका प्रत्यक्ष प्रचितीमुळे त्यांची ही मान्यता कायमची बदलून गेली. एकदा नर्मदेच्या किनार्यावरील चांदोद-करनाळीच्या एका छोट्या कालिमंदिरामध्ये ते गेले होते.
कालीच्या मूर्तीसमोर गेल्यावर त्यांना असे जाणविले की, साक्षात कालिमाता समोर उभी आहे. या अनुभूतीनंतर त्यांनी ‘पाषाण प्रतिमा’ अशा नावाने कविता लिहिली. त्या कालिमंदिरामध्ये अरविंदांनी लिहिलेले हे काव्य ठेवण्यात आले आहे. मूर्तिपूजा निरर्थक नाही. मूर्तीमध्येदेखील भगवंताच्या चैतन्याचे अस्तित्त्व असते. याची प्रत्यक्ष प्रचिती आल्यावर मूर्तिपूजेविषयी त्यांच्या शंकेचे व अश्रद्धेचे निरसन झाले.
अनायासे झालेल्या या अनुभूतींमुळे अरविंदांसारख्या युरोपियन संस्कारांनी जडणघडण झालेल्या माणसाच्या जीवनामध्ये आध्यात्मिक जगताविषयी आकर्षण जागृत झाले.
त्यांच्या हृदयांतरी भगवंताला प्राप्त करण्याच्या प्रेरणेचे बीजारोपण झाले आणि ते अंतर्मुख झाले. योगमार्गावर सहजपणे चालू लागले.
अरविंदांचा धाकटा भाऊ बारिन्द्र, विंध्यच्या जंगलामधून विषारी ताप घेऊन आला होता. डॉक्टरांनी औषधे दिली, तरीही ताप उतरत नव्हता. अरविंदांना भेटावयास आलेल्या एका साधूने त्यांना विचारले की, “मी योगशक्तीचा प्रयोग केला तर ताप उतरेल.” अरविंद म्हणाले, “कोणत्याही उपायाने ताप उतरला तरी आपल्याला काय अडचण आहे?” नंतर या संन्याशाने पाण्याने भरलेला एक पेला व चाकू मागविला.
पेला हातात धरून त्यामध्ये चाकूने चौकडीचे चिन्ह काढले व ते पाणी बारिन्द्रला पिण्यास दिले व ‘आता ताप येणार नाही’ अशा अर्थाचे बोलला आणि खरोखर तसेच झाले. त्यानंतर तो साधू निघून गेला. मात्र, अरविंदांना योगशक्तीचा व्यवहारात उपयोग करता येतो याची प्रचिती देऊन गेला म्हणून त्यांनी विचार केला की, योगसाधनेद्वारे शक्ती मिळविता आल्यास या शक्तीचा देशाच्या स्वातंत्र्यासाठी का उपयोग करून घेऊ नये?
अशाप्रकारे ते योगाकडे वळले.
आध्यात्मिक अनुभूतींमुळे अरविंदांचा योगसाधनेमध्ये रस निर्माण झाला व वाढला. प्रचलित योगसाधना म्हणजे संसार व जगाचा त्याग करण्याचा मार्ग हे अरविंदांना मान्य नव्हते. त्यांना असे वाटे, “ज्या योगसाधनेमध्ये संसार व जगाचा त्याग करावयास सांगितले जाते तो योग माझ्यासाठी नाही.” त्याकाळी भारताचे स्वातंत्र्य हेच त्यांचे ध्येय होते.
या कार्यासाठी त्यांना योगशक्ती हवी होती. ज्या योगसाधनेमुळे आध्यात्मिक शक्तीचा कार्यक्षेत्रामध्ये उपयोग होऊ शकेल, तीच योगसाधना त्यांना अपेक्षित होती. योगशक्तीच्या प्रत्यक्ष कार्यासाठी उपयोग होतात, असे पुरावेदेखील त्यांना मिळाले होते.
- मधू देवळेकर
(लेखक माजी आमदार आहेत.)
आध्यात्मिक अरविंद घोष अरविंद घोष जयंती Spiritual Arvind Ghosh Arvind Ghosh Jayanti
@@AUTHORINFO_V1@@